श्री. प्रसाद विश्वास लागू
मुख्याध्यापक
नमस्कार,
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे ही सर्वांगीण विकास आणि उन्नतीच्या क्षेत्रात राष्ट्रसेवा करण्याचे ध्येय असलेली एक अग्रणी संस्था आहे. सोसायटीचे कार्य सर्वज्ञात आहे आणि महाराष्ट्र सरकारकडून त्याचा खूप आदर केला जातो. शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते.
शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो. याच धर्तीवर माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (प्राथमिक विभाग),पुणे प्रशालेची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली असून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचालित मराठी माध्यमाची व कायम स्वरूपी विनाअनुदानित तत्वावर चालवण्यात येणारी प्रशाला आहे. प्रशालेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबर त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने शारिरीक, मानसिक, बौद्धिक, व्यवसायिक, आध्यात्मिक, नैतिक अशा सर्व बाजूंनी विकसित असलेल्या परिपूर्ण व समाजहितासाठी समर्पित असा नागरिक घडवण्यासाठी प्रशाला सदैव प्रयत्नशील असते.
काळाची गरज आणि आमच्या पालकांच्या आणि हितचिंतकांच्या सततच्या मागणीमुळे तसेच व्यापक विचारसरणीच्या सोसायटीमुळे आज अखेर शाळेत खेळ गट ते इयत्ता सातवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सण-समारंभ शाळेत साजरे करून विद्यार्थ्यांना कला गुण सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा. त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा, आत्मविश्वास वाढावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी, विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचबरोबर आपली संस्कृतीही जोपासली जावी ही शाळेची उद्दिष्टे असल्याने शाळेमध्ये विविध सण - समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.