आमच्याबद्दल
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (प्राथमिक विभाग) मध्ये आपले सहर्ष स्वागत
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. लोकमान्य टिळकांनी निर्माण केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल सारख्या पवित्र परिसरात शाळेची सुसज्ज इमारत आहे. लोकमान्य टिळकांनी समोर ठेवलेल्या ध्येयाला अनुसरूनच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारी अग्रगण्य शाळा. केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण नाही तर सुशिक्षित समाजाबरोबरच सुसंस्कृत नागरिक निर्मितीचे ध्येय आहे. शाळेमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच आपली संस्कृती आणि संस्कार कसे जपता येतील यासाठी विशेष प्रयत्न शाळा करत असते.
शाळेतील शिक्षक अतिशय उपक्रमशील असून संस्थेकडून वेळोवेळी शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी संस्थेकडून विविध प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. मातृभाषेबरोबरच देवभाषा संस्कृत बोलीचे प्रशिक्षण देखील विद्यार्थ्यांना दिले जाते त्याच बरोबर भविष्यात जगाला तोंड देता यावं यासाठी स्पोकन इंग्लिशसारख्या भाषेचं शिक्षण विद्यार्थ्यांना अगदी पहिल्या वर्गापासूनच दिले जाते.
शारीरिक सुदृढता रहावी आणि मनही प्रसन्न राहावं यासाठी शाळेमध्ये विविध क्रीडा उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये बुद्धिबळ, खो खो, मल्लखांब,लंगडी, कब बुलबुल, स्काऊट, गाईड इ. प्रकार घेतले जातात. शास्त्रीय संगीतासारखा उपक्रम हे शाळेचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे. कथ्थक,भरतनाट्यम,संवादिनी वादन, तबला आणि गायन याचे वर्गही शाळेत घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या विचारांना पारंपरिकते बरोबरच आधुनिकतेची जोड दिली जाते. स्नेहसंमेलनाचे आयोजन विशिष्ट विषय घेऊन केले जाते.शाळेमध्ये प्रत्येक वर्गात वाचन कोपरा आहे. त्याचबरोबर हजारो पुस्तकांचे ग्रंथालय देखील शाळेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. संगीत,चित्रकला इत्यादी उपक्रमांसाठी वेगळ्या वर्गखोल्यांची रचना केलेली आहे.विद्यार्थ्यांचे वाचन, वक्तृत्व, स्वतःचा विचार, विविध कलागुण तसेच एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा यासाठी शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. गिर्यारोहण या उपक्रमातून शारीरिक सुदृढता तर निसर्ग सहल, क्षेत्रभेट आणि सहली यासारख्या उपक्रमातून भारताचा ऐतिहासिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शाळा निरंतर करते. प्रत्येक इयत्तेचा वेगळा परिपाठ घेतला जातो यामध्ये वेगळा विषय घेऊन सखोलपणे तो विषय परिपाठातून सादर केला जातो.
विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी तज्ञांची आणि सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन शाळा करत असते. स्वसंरक्षण, सामाजिक बांधिलकी,लैंगिक शिक्षण,व्यवसायाभिमुखता, संशोधक वृत्ती, वैचारिक सुसंपन्नता यासारखे विषय या व्याख्यानातून विद्यार्थ्यांसमोर मांडले जातात. शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिंपियाड परीक्षा, राष्ट्रभाषा, एलिमेंटरी, इंटरमिजिएट तसेच अनेक स्पर्धा परीक्षा यांचे विशेष मार्गदर्शन करून त्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याचे काम गेले अनेक वर्ष शाळा करत आहे.
अध्ययन अक्षम मुलांसाठी विशेष तासिकांची रचना शाळा गेली अनेक वर्ष करत आहे. त्या विद्यार्थ्यांचे पुनर्भरण , पुनराध्यापन घेतले जाते. शाळेमध्ये महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम राबवला जातो पण वैविध्यपूर्ण प्रश्नपत्रिकांची रचना असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास अधिक होतो. परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचवला जातो.
उद्दिष्ट
- विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुसंस्कारित, सशक्त, स्वावलंबी व राष्ट्राभिमानी नागरिक घडविणे.
- संस्कार, शिक्षण आणि क्रीडा यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे.
- मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणारे आणि आधुनिकतेशी जुळवून घेणारे विद्यार्थी तयार करणे.
- समाजासाठी हितकर विचारसरणी असलेल्या कर्तबगार व जबाबदार नागरिकांची पिढी घडविणे.
ध्येय
- विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक,बौद्धिक विकास होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.
- सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी विविध सण, उत्सव शाळेत साजरे करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती सांगणे.
- शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करणे.
- शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी क्रीडा व शारीरिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देणे.
- सुसंस्कृत, राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्त्व घडवून त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणे.
- पर्यावरण व ई-वेस्ट बाबत जागरूकता वाढवणे, वाचनाची आवड निर्माण करणे.
- स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करून त्यासाठी मार्गदर्शन करणे.
आम्ही सर्वोत्तम का आहोत?
उत्कृष्ट शैक्षणिक घटक
शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.
अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.
अत्याधुनिक सुविधा
शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.