InSearch Outdoor team चे मनापासून कौतुक आणि शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे विशेष आभार! ❤️
सहल म्हटलं की मुलांचा उत्साह, मजा आणि आठवणी असतातच… पण त्यामागे किती नियोजन, जबाबदारी आणि प्रसंगी आलेल्या अडचणींमधून मार्ग काढण्याची धडपड असते, हे आज प्रकर्षाने जाणवलं.आलेल्या प्रत्येक अडचणीला सामोरं जात, परिस्थिती सांभाळत तुम्ही ही सहल यशस्वीरीत्या पार पाडलीत आणि आमच्या मुलांना आयुष्यभर जपून ठेवावेत असे काही अविस्मरणीय क्षण दिलेत, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद! 🙏आता सहल संपली असली तरी constant reporting अजूनही चालू आहे… 😄म्हणजे आठवणींचा प्रवास अजून सुरूच आहे! ❤️मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या गोष्टी ऐकताना जाणवणारा उत्साह — हाच या संपूर्ण मेहनतीचा खरा मोबदला आहे. ✨
या ग्रुप वरचे इनसर्च टिम चे ट्रेलचे मेसेज वाचल्यावरच लक्षात आलं होतं की किती अनुभवी टीम आहे ही... गोड लहान मुलांना आवडणारी मजेशीर भाषाशैली मेसेज मध्ये वाचूनच उत्कंठा वाढलेली होती जायची मुलांची...जी मुलं रोज वेळेवर झोपत नाहीत ती लवकर स्वतः झोपून सकाळी हाक मारायचा अवकाश.. चला उठा ट्रेल ला जायचं ना म्हणायचा अवकाश खिदळत उठून भरभर आवरुन तय्यार वेळेच्या आत... गाड्या पण स्वच्छ व ऐसपैस पाहून स्वारी खूश😍. .
ट्रेल चे दादा फरशीच्या मैदानावर पालकांना पण ज्या उत्साहाने सर्व सांगत होते तेव्हाच लक्षात आले आज मस्त जाणार दिवस आपल्या लाडूचा🥰त्याचप्रमाणे मुलांना खूप छान काळजीपूर्वक त्यांनी संपूर्ण ट्रेल मध्ये सांभाळले.. 👌प्रवासात आलेल्या अडचणीचा लवलेश पण नाही जाणवला इतकं छान व्यवस्थापन आहे टीमचं👏शांतपणे सर्व सांभाळले, यातूनच टिमचा दांडगा अनुभव दिसला👍आल्यावर मुलं खूपच आनंदाने सर्व गंमती जमती सांगण्यात गुंगली होती..त्या आनंदातच मुले लवकर झोपली पण😁चिकू पिकू अंकात वाचलेल्या गोष्टींशी मुलं रिलेट करुन सांगत होते की, तसंच आम्हाला ताई दादा कसले भारी..किती छान निसर्गाची व प्राणी, पक्षी, फुले झाडे यांची माहिती देत होते.. कमाल!!! आम्हा आई वडिलांना खूप समाधान मिळाले शाळेने इतक्या छान टीम ला या ट्रेल साठी निवडले🥰
शाळेचे, शाळेतल्या ताईंचे, ट्रेलच्या सर्व ताई दादांचे मनापासून आभार🙏💕आणि ..हो..खरंच लाडू व बर्फी छान वर्ख चढवून घरी परतले .. ☺️🤭धन्यवाद,
आपण संपूर्ण सहलीचे अतिशय सुंदर नियोजन आणि उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार! 🙏मुलांची सुरक्षितता, त्यांची काळजी आणि त्यांना दिलेला सुंदर अनुभव यासाठी सर्व शिक्षक व टीमचे विशेष कौतुक. ❤️सर्व मुला-मुलींनी सहलीचा मनापासून आनंद घेतला आणि त्यांच्यासाठी हा एक सुंदर व कायम लक्षात राहणारा अनुभव ठरला. 🌿😊
मुला-मुलींनी फक्त परत आणले नाही, तर त्यांच्यासोबत अनेक सुंदर आठवणीही दिल्यात यासाठी मनापासून धन्यवाद! ❤️🙏
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, सहकारी, आयोजक व इनसर्च आऊटडोअर्सच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा💐💐 आणि धन्यवाद..!🙏पुन्हा अशाच सुंदर उपक्रमात भेटण्याची नक्कीच अपेक्षा आहे. 😊🙏
शिक्षक दिनानिमित्त आज दि. ०७/०९/२०२६ रोजी, मा स. गोळवलाकर गुरुजी विद्यालयात, पालकांनी अध्यापनाचे काम केले. माझ्याकडे इयत्ता ५ वी कृष्ण आणि ६ वी मृग हे वर्ग होते. या वर्गांना मी मूल्याशिक्षणतील "देणे" हे मूल्य शिकवले. मुलांना २ activities करायला सांगितल्या.
१. कार्ड पेपर आपट्याच्या पानाच्या आकारात कापणे व त्यावर एक छान सुविचार लिहून आपल्या वर्ग सावंगड्यांना देणे आणि त्यायोगे निसर्गाचा ऱ्हास टाळणे.
२. आपल्या वर्गात "हरवले-सापडले" या नावाचा एक बॉक्स तयार करणे आणि कोणाच्या वस्तु आपल्या वर्गात सापडल्या ते त्या ता बॉक्स मध्ये टाकून दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या मदतीने ओळख पटवून ज्याच्या त्याला देणे.
आजचे तासिकांपासून नाश्त्यापर्यंतचे सर्वच नियोजन उत्तम होते. एकापेक्षा जास्त तासिका घेता आल्यामुळे खूप आनंद वाटला.
आज शिक्षक- शिक्षिका असणारे सर्व पालक अतिशय उत्साहाने आनंदाने आपापले काम करताना दिसून आले. प्रत्येकाच्या शिक्षक म्हणून वावरण्यामध्ये आत्मियता आणि समरसता दिसली. सर्व पालक प्रतिनिधींचे सहकार्य वाखणण्याजोगे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग तर उत्तम होताच परंतू आपल्या शाळेतील विद्यार्थी हुशार, नवीन तंत्रज्ञानाची ओळख असलेले, चौकस, उत्तरं देण्यात तत्पर आहेत हे या उपक्रमाद्वारे समजून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचही विशेष कौतुक!
शिक्षक दिनानिमित्त ही संधी दिल्याबद्दल 'माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय' आणि 'पालक-शिक्षक संघाचे' आभार!
एक सुंदर अनुभव...
आज शिक्षक दिन साजरा करण्याच्या निमित्ताने शाळेत
1 ली रवि वर्गातल्या मुलांना हस्तकला आणि 2 री प्रभाकर वर्गात शब्दकोडी शिकवायचा अनुभव मिळाला 👍🏻
इतकी निरागसता, इतका उत्साह जोडीला खोड्या 😄😄खरंच मस्त अनुभव 👌🏻👌🏻शिक्षक होणे सोपे नाही हे अनुभवता आलं 🙏🏻
सर्वात कौतुक म्हणजे न सांगता निघताना मुलांनी वाकून नमस्कार करुन शिक्षक दिनाच्या दिलेल्या शुभेच्छा... त्याला तोड नाही.. 👍🏻🙏🏻यातूनच शाळेचे आणि पालकांचे संस्कार दिसून येतात..उत्तम नियोजन करणाऱ्या पालक संघांचे मनापासून कोतुक आणि आभार 🙏🏻पुनःश्च सर्व शिक्षकांना नमस्कार 🙏🏻
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसोबत संगीताच्या विषयावर संवाद साधण्याची संधी मिळाली. शिक्षक म्हणून हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच वेगळा आणि आनंद देणारा होता.
सुरुवात मी काही अगदी साध्या प्रश्नांनी केली. “तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात का?”,“गाणं गाता येतं का?”,“गाणं तयार कसं होतं माहिती आहे का?”,“गाण्यात नेमकं काय काय असतं?”
मुलांनी दिलेला प्रतिसाद खूप उत्साहवर्धक होता.त्यांना स्वर माहिती होते, ताल माहिती होता आणि गाण्याला चाल कशी लावली जाते याचीही त्यांना कल्पना होती. म्हणजेच संगीताविषयी त्यांची समज माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगली होती.
त्यानंतर गाण्याच्या निर्मितीमागच्या प्रक्रियेबद्दल संवाद साधला. गीतकार, संगीतकार, गायक, वादक, संगीत संयोजन, recording, mixing, mastering आणि music production या सगळ्या गोष्टी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून समजून घेतल्या.या संवादाला अधिक प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या “श्री श्रीपाद श्रीवल्लभ” या गाण्याच्या Music Productionचा Audio BTS Video त्यांना दाखवला.
आपण एखादं गाणं दोन-तीन मिनिटांत ऐकतो; पण त्या काही मिनिटांच्या गाण्यामागे किती मेहनत, किती वेगवेगळे sounds, किती निर्णय आणि किती लोकांचं योगदान असतं, हे मुलांना त्या BTS मधून प्रत्यक्ष पाहता आलं.
या सगळ्या संवादात एक गोष्ट विशेष लक्षात राहिली ती म्हणजे AI बद्दल मुलांची असलेली माहिती.AI चा विषय निघाल्यावर मुलांनी सहजपणे ChatGPT, Claude आणि Gemini यांची नावं घेतली. इतक्या लहान वयात त्यांना या टूल्स ची माहिती आहे, हे पाहून आजची पिढी तंत्रज्ञानाच्या जगाशी किती वेगाने जोडली जात आहे याची जाणीव झाली.
माझ्यासाठी हा अनुभव केवळ त्यांना काही शिकवण्याचा नव्हता.मी त्यांना संगीत आणि Music Production बद्दल सांगत होतो, पण त्याच वेळी मुलांच्या उत्तरांमधून आणि त्यांच्या प्रश्नांमधून मी स्वतःही काहीतरी शिकत होतो.मला पुन्हा एकदा जाणवलं की मुलांना फक्त माहिती देण्यापेक्षा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि त्यांच्या कुतूहलाला दिशा देणं अधिक महत्त्वाचं आहे.Music, Technology आणि AI यांचा हा संगम भविष्यात आणखी interesting असणार आहे.
२५ मिनिटांचा हा संवाद कधी संपला हे कळलंच नाही. मुलांचा उत्साह, त्यांचे प्रश्न आणि त्यांचा सहभाग यामुळे हा अनुभव माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा ठरला.
शिक्षक दिनाच्या या अनुभवातून एक गोष्ट मनात राहिली—
मुलांना शिकवताना आपण फक्त त्यांना काय सांगतो हे महत्त्वाचं नसतं; आपण त्यांना कोणते प्रश्न विचारायला शिकवतो, हे त्याहून महत्त्वाचं असतं.
आणि शेवटी मुलांना सांगितलेली एक गोष्ट—गाणं फक्त ऐकायचं नसतं… ते समजूनही ऐकता येतं!”
या सुंदर अनुभवाची संधी दिल्याबद्दल माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे आणि तसेच पालक-शिक्षक संघांचे मनःपूर्वक आभार!!!🙏🙏
मी अमित उमरीकर.माझी मुलगी कु.माही अमित उमरीकर,इयत्ता तिसरी,भास्कर मध्ये शिकत आहे. माहीसाठी शाळा कोणती निवडायची ? यावर सर्वानुमते मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचे ठरले. काही ठिकाणी चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळाले. 'माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय'
मराठी माध्यमाची सर्वात चांगली शाळा. शाळेचा फॉर्म भरला व खेळगटाच्या यादीत नाव बघितल्यावर खरंच आनंद झाला की, आपल्या मुलीसाठी खूप चांगली शाळा मिळाली आणि शाळा सुरू झाल्यावर लगेचच याचा प्रत्ययही आला. शाळेत शिकवण्याची पद्धत, सर्व मुलांना प्रत्येक कार्यक्रमात सामावून घेणे,वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष देणे या व अशा अनेक गोष्टींमध्ये आम्हाला शाळेचा अनुभव खूपच चांगला आला. सर्वात महत्त्वाचे शाळेत आपले सण, आपली संस्कृती याची माहिती उत्तम पद्धतीने दिले जाते तसेच त्याचे महत्त्वही पटवून दिले जाते.सर्व सण शाळेत खूप उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे मुलांना लहान वयातच आपल्या संस्कृतीची ओळख होत आहे.
शाळेत मुलांना फक्त अभ्यासावर भर न देता इतर कलागुण जोपासण्यासाठी प्रोत्साहित केले जाते व यासाठी व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाते. शिक्षकांकडून मुलांवर खेळ,अभ्यास, विविध स्पर्धा तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतली जाणारी मेहनत वाखाणण्याजोगी आहे. आपल्या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये उत्तम यश मिळवत आहेत. यामुळे आम्हाला आमच्या मुलांच्या उज्वल भवितव्याची खात्री वाटते.
आमच्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे हे सुरुवातीपासूनच नक्की होते. त्यासाठी काही नावे विचाराधीन होती. 'माधव मदाशिव गोळवलकर गुरुजी' विद्यालयात अभ्यासाबरोबरच होणाऱ्या इतर संस्कारांबददल माहिती मिळाली आणि ही शाळा नक्की केली. सुदैवाने प्रवेशही मिळाला. सुरुवातीपासूनच शाळेचे वेगळेपण जाणवू लागले. संस्कार शाळेतून घडतात या विचाराची खूप मोठी व्याप्ती आहे शाळेच्या संकल्पनेत. आणि मुलांची रोजची दिनचर्या ते घेतले जाणारे वेगवेगळे उपक्रम यातून हे पदोपदी जाणवते.
कोणत्याही शाळेचे मुख्य काम 'ज्ञानदान'! यात शाळा सर्वोपरी प्रयत्नशील आहे. सर्वच शिक्षक-शिक्षिका त्यांच्या विषयात पारंगत आणि मुलांपर्यंत तो विषय सोपा, त्यांना आवडेल असा करून पोहोचवण्यात निपूण आहेत. तसेच गुरु आणि विद्यार्थी यांच्यातले भावनिक नातेही शाळेत छान फुलवले आणि जपले जाते आहे.अलिकडच्या काळात खेळ आणि कला प्रांतातही मुलांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेप्रमाणे अध्ययन करता यावे म्हणून शाळेने कुशल मार्गदर्शकांकरवी अधिकचे वर्ग सुरु केलेले आहेत.
बालवयापासूनच असलेले बोली संस्कृत हे एक महत्वाचे वैशिष्ट्यही शाळेबाबत नमूद करावेसे वाटते. आणि या सर्वांपलिकडे जाऊन शाळा एक राष्ट्रप्रेमी, समाजाभिमुख, सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी जी पावले उचलत आहे ते केवळ अतुलनीय आहे. भारतीय म्हणून आपली संस्कृती, इतिहास, आजचे स्वातंत्र्य आणि त्यामागील त्यागमूर्तींचे महत्व मुलांच्या मनावर बिंबवण्यात शाळा १००% यशस्वी होते आहे. यासाठी होणारे परिपाठ, साजरे केले जाणार सण किंवा 'मृत्युंजयी सावरकर' हा अभूतपूर्व कार्यक्रम;सर्वांचाच मुलांवर खूप सकारात्मक प्रभाव पडतो आहे. यात पालकांनाही सहभागाची संधी दिली जाते. तसेच शाळेच्या वैचारिक बैठकीला अनुरूप सूचनांचाही शाळा विचार करून त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करते हे ही विशेषच आहे.सारांश सांगायचा तर, 'माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय' हा आमच्या कन्येच्या आयुष्यात घडलेला 'सुवर्णयोग'च म्हणावा लागेल.
आमचा उत्तम शाळेचा शोध येथे पूर्ण होऊन, एक आदर्श नागरिक घडविण्याचा व उच्च नितीमुल्यांचे बिज रुजविण्याचा प्रवास इथून सुरु झाला. आपल्या या विद्यालयात मराठी माध्यमातून सहशिक्षण (CO-ED) वातावरणात शिक्षण प्रदान केले जाते. बालवयातच राष्ट्रप्रेम,आपली संस्कृती-परस्परांबाबत जागरुकता व मराठी भाषेचा सन्मान करायला आपोआपच येथे विद्यार्थी शिकतात. असे येथे वातावरण आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी ह्या तिन्ही बिंदूंना जोडणाऱ्या समानतेच्या बाजू मनमोकळ्या व सदृढ संवादाने जोडलेल्या आहेत . हयाचा प्रत्यय आम्ही घेत आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडचणी येत आहेत असे शिक्षकांच्या लक्षात आल्यास त्या अडचणी नक्की कशामुळे येत आहेत याचा शोध घेऊन पालकांबरोबर संवाद साधून व एकत्रीत प्रयत्नांमधून त्या अडचणींवर मात केली जाते.
कोरोना काळात तंत्रज्ञानाचा वापर करत विद्येची ही गंगा प्रवाही होती. मुलांना जास्त स्क्रीन टाईमने डोळ्यांना ताण पडू नये असा समतोल राखत ऑनलाइन शाळेचे नियोजन केले होते. सर्वांना समान संधी देऊन त्यांच्यातील योग्य गुण हेरून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुद्धा शिक्षकांकडून मन लावून करून घेतली जात होती. यश मिळवण्यासाठी तयारी करून घेण्यासोबतच अपयश आले तरी खिलाडूवृत्तीने ते स्वीकारून नव्या जोमाने यशप्राप्तीसाठी हे विद्यालय आपल्या मुलांना उच्च नीतीमुल्ये शिकवत तयार करते आहे.