- Events /
- गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी इयत्ता चौथी ‘सविता’ वर्गाचा विशेष परिपाठ ‘गुरुपौर्णिमा’ या विषयावर उत्साहपूर्ण वातावरणात सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥” या गुरुस्तवनाने करून गुरूंना विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून परिपाठात रंगत आणली. काही विद्यार्थ्यांच्या समूहाने ‘होऊ गुणवंत आम्ही, होऊ यशवंत’ हे वैज्ञानिक दृष्टिकोन, समता आणि बंधुता या मूल्यांचे संवर्धन करणारे प्रेरणादायी ईशस्तवन सादर केले. ज्ञान-विज्ञानाचा वारसा पुढे नेत गुणवंत व यशवंत नागरिक होण्याची प्रेरणा या गीतातून विद्यार्थ्यांनी दिली.मिहीर, समर्थ, रिशांक, अनिका, अस्मी, भामती आणि श्रावणी यांनी आत्मविश्वासपूर्ण व ओघवत्या शैलीत संवादरूपाने गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच, गुरूंच्या मार्गदर्शनाचे पालन करून आदर्श नागरिक बनण्याची व देशाचे नाव उज्ज्वल करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.विद्यार्थिनी नीरजाने गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारी सुंदर कथा सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘गुरुचरित्राचे कर पारायण’ या गीतावर सादर केलेल्या आकर्षक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. नृत्याच्या शेवटी विद्यार्थ्यांनी श्री दत्तगुरूंचे त्रिमूर्ती स्वरूप साकारल्याने कार्यक्रमाला विशेष उठाव प्राप्त झाला.कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थिनी भामती हिच्या आभारप्रदर्शनाने झाला.
याप्रसंगी माननीय मुख्याध्यापक लागू सर यांनी परिपाठाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, निवेदन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अत्यंत प्रभावी होता. नृत्याच्या शेवटी विद्यार्थ्यांनी साकारलेले श्री दत्तगुरूंचे त्रिमूर्ती स्वरूप विशेष भावले. संपूर्ण परिपाठातील विद्यार्थ्यांचा उत्साह, सादरीकरणातील ताकद आणि शिस्त वाखाणण्याजोगी होती. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंना कोणतीही भौतिक भेटवस्तू न देता मनापासून अभ्यास करून यश संपादन करणे, हीच गुरूंना दिलेली सर्वश्रेष्ठ गुरुदक्षिणा असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या विशेष परिपाठाची संहिता वर्गशिक्षिका शुभांगी पानसरे यांनी लिहिली. कार्यक्रमास इयत्ता चौथी ‘पूषण’ व ‘दिवाकर’ तसेच इयत्ता तिसरी ‘आदित्य’ व ‘दिनकर’ वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वर्गशिक्षिका स्मिता नाईकडे, सोनिया तांबेकर आणि रोहिणी कोहिणकर उपस्थित होत्या. अशा प्रकारे गुरूंची महती, गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि आदर्श मूल्यांचा संदेश देणारा ‘गुरुपौर्णिमा’ या विषयावरील विशेष परिपाठ प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More