- Events /
- देवी आराधना -नवरात्र
देवी आराधना -नवरात्र
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ॥
मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी इयत्ता दुसरी ‘भानू’ वर्गातील विद्यार्थ्यांनी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ या विषयावर आधारित विशेष परिपाठाचे अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात सादरीकरण केले.
परिपाठाची सुरुवात ‘या देवी सर्वभूतेषु’ या देवीस्तुतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या मधुर व ओघवत्या शब्दांत कार्यक्रमाची प्रभावी प्रस्तावना सादर केली. त्यानंतर विद्यार्थिनींनी ‘महालक्ष्मी अष्टकम’ या देवीस्तोत्राचे सुरेल, शुद्ध आणि भावपूर्ण पठण करून उपस्थितांची मने जिंकली.नवरात्रोत्सव हा भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असलेला उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यामागील पौराणिक महत्त्व विद्यार्थ्यांनी सुंदर शब्दांत विशद केले. देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय प्रस्थापित केला, ही प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली. तसेच नवदुर्गांची नऊ रूपे, प्रत्येक रूपाचे वैशिष्ट्य आणि नवरात्रीतील नऊ दिवसांचे महत्त्व यांची माहितीही अतिशय भक्तिभावाने सादर करण्यात आली. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात आली.कार्यक्रमात भक्तीबरोबरच नृत्याचा रंगही खुलला. ‘आई तुझ्या ग चरणी, आभाळ धरणी येऊन विसावले’ आणि ‘गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये’ या उत्साहवर्धक गीतांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्याविष्काराने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त नृत्यसादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
या विशेष परिपाठातून विद्यार्थ्यांनी स्त्रीशक्तीचा गौरव करणारा एक महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशही दिला. स्त्री ही प्रेम, माया आणि वात्सल्याचा स्रोत असण्याबरोबरच धैर्य, जिद्द आणि सामर्थ्य यांचेही प्रतीक आहे. प्रसंगानुरूप ती प्रेमळ आई, कर्तव्यदक्ष मुलगी, खंबीर बहीण आणि अन्यायाविरुद्ध लढणारी रणरागिणी ठरू शकते. त्यामुळे नवरात्रोत्सवात केवळ देवीच्या मूर्तीची पूजा न करता आपल्या घरातील आजी, आई, मावशी, बहीण, मुलगी, काकू, मामी, वहिनी आणि ताई अशा प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे हीच खरी देवीची उपासना आहे, हा विचार विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला. समाजात, घरात आणि शाळेत प्रत्येक स्त्रीचा आदर करण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी यावेळी केला.परिपाठाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे देवीची आरती केली. भक्ती, संस्कार आणि उत्साहाने परिपूर्ण अशा या परिपाठाचे सादरीकरण पाहून माननीय मुख्याध्यापिका वासंतीताई बनकर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. आपल्या मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्त्रीशक्तीचा नेहमी आदर करण्याचा आणि आपल्या जीवनात चांगले संस्कार जोपासण्याचा मोलाचा संदेश दिला.
या विशेष परिपाठाचे संहितालेखन श्वेतांबरी बोध यांनी केले. तसेच योगिता शिंदे, स्नेहा खटावकर आणि प्राजक्ता बेंद्रे यांचे परिपाठाच्या यशस्वी सादरीकरणासाठी मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी इयत्ता दुसरी ‘प्रभाकर’ व ‘मित्र’ वर्गातील विद्यार्थीही उपस्थित होते.अशा प्रकारे माननीय मुख्याध्यापिका वासंतीताई बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दुसरी ‘भानू’ वर्गाचा शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष परिपाठ भक्तिमय वातावरणात, उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला.
“स्त्रीचा सन्मान हाच खरा देवीचा सन्मान!”
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More