- Events /
- शास्त्रीय नृत्य व संगीताचे बहारदार सादरीकरण
शास्त्रीय नृत्य व संगीताचे बहारदार सादरीकरण
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डी.ई.एस. सेकंडरी स्कूल, मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय आणि एन.ई.एम.एस. या शाळांमधील विद्यार्थी गेली पाच वर्षे शास्त्रीय गायन, हार्मोनियम, तबला वादन, कथक आणि भरतनाट्यम या अभिजात शास्त्रीय कलांचे प्रशिक्षण घेत आहेत.अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार हे विद्यार्थी नियमितपणे परीक्षा देत असून शास्त्रीय संगीत व नृत्याच्या क्षेत्रात आपली कला विकसित करीत आहेत.
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश हॉल, टिळक रोड, पुणे येथे या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. अपर्णा साने पूर्व प्राथमिक मुख्याध्यापक व वासंती बनकर प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक तसेच सर्व कला शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमासाठी श्री. विवेक मठकरी डीईएस नियामक मंडळ परिषद सदस्य आणि श्री. मिलिंद कांबळे डीईएस सांस्कृतिक समिती अध्यक्ष हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अभंग गायनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकल शास्त्रीय गायन, एकल व सामूहिक शास्त्रीय वादन तसेच एकल व सामूहिक कथक आणि भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तबला, हार्मोनियम, गायन आणि नृत्य यांच्या सुरेल संगमातून भारतीय शास्त्रीय कलेचे मनोहारी दर्शन उपस्थितांना घडले.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ६९ विद्यार्थ्यांनी सादर केलेले शुद्ध शास्त्रीय संगीत व नृत्याचे सादरीकरण. विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध, आत्मविश्वासपूर्ण आणि दर्जेदार सादरीकरण पाहून उपस्थित पालकांनी विशेष दाद दिली. विद्यार्थ्यांच्या या कलाप्रवासामागे त्यांच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचे सहकार्य यांचा मोठा वाटा आहे.
गुरुपौर्णिमेचे औचित्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुरुवंदना अर्पण करून त्यांचा सन्मान केला. भारतीय संस्कृतीतील ‘गुरु’ या संकल्पनेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा क्षण अत्यंत भावस्पर्शी होता.
कार्यक्रमात श्री. मठकरी सर आणि श्री. मिलिंद कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्याची साधना सातत्याने करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि कलाशिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणाऱ्या बळाचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी पटवर्धन आणि सौ. श्रद्धा रांजेकर यांनी केले. सौ. हर्षदा कारेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची भूमिका व उद्देश स्पष्ट केला, तर सौ. प्राजक्ता बेंद्रे यांनी आभार प्रदर्शन केले.
संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या पाल्यांनी इतक्या लहान वयात शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे सादरीकरण आत्मविश्वासाने करताना पाहणे हा पालकांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.अभंगाच्या भक्तिमय सुरांनी सुरू झालेल्या या स्नेहसंमेलनाची हार्मोनियमवरील सुरेल ‘भैरवी’ने भावपूर्ण सांगता झाली. गुरूंच्या चरणी कृतज्ञता अर्पण करणारा आणि भारतीय शास्त्रीय कलेची समृद्ध परंपरा पुढे नेणाऱ्या नव्या पिढीचा आत्मविश्वास अधोरेखित करणारा हा स्नेहसंमेलनाचा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहिला.
कार्यक्रम
-
गड शिवनेरी - इतिहासा ...
गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा पाच व ... Read More
-
खंडेनवमी - शौर्य व श ...
दि. 12 ऑक्टोबर 2026पासून सुरू झालेल्या शारदीय ... Read More
-
त्रिवेणी-- विशेष परि ...
गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी इयत्ता सहा ... Read More
-
देवी आराधना -नवरात्र ...
॥ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके। शरण्य ... Read More
-
सहभागाचा नवा अध्याय ...
या वर्षीचा शिक्षक दिन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रो ... Read More